शार्क टॅंक इंडिया – “ये सब दोगलापण है” म्हणणाऱ्या अश्निर ग्रोव्हरची गोष्ट.
शार्क टॅंक इंडियामध्ये शार्क म्हणून अश्निर ग्रोव्हर यांनी पहिल्या सीझनमध्ये काम पहिले होते. ते भारत पेचे माजी संस्थापक राहिलेले आहेत. त्यांच्याबद्दलची माहिती पुढील लेखातून समजून घेऊयात.
अश्निर ग्रोव्हर यांचा जन्म दिल्लीमध्ये झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात अश्निर यांचे लहानपण गेले. त्यांचे वडील चार्टर्ड अकाउंटंट आणि आई शिक्षिका होती. घरात सगळेच नोकरीला होते. अश्निर यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिल्ली आयआयटी मधून २००४ मध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केली. त्यांना कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला कॉलेजकडून फ्रान्सला जाण्याची संधी मिळाली. आयआयएम अहमदाबाद मधून २००६ मध्ये त्यांनी एमबीए पूर्ण केले. कॉलेज पूर्ण केल्यानंतर अश्निर यांनी कोटक इन्व्हेस्टमेंट बँकिंग मध्ये कामाला सुरुवात केली.
त्यांनी या ठिकाणी ७ वर्ष जॉब केला, त्या कंपनीत असताना अश्निर यांनी १० डील पूर्ण केल्या. यामधून जवळपास कंपनीला २०,००० कोटी रुपयांची कामे त्यांनी मिळवून दिली. त्यानंतर अमेरिकन एक्स्प्रेस इंडिया मध्ये नोकरीला सुरुवात केली. ही कंपनी इतर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असायची. यावेळी अश्निर यांना १०० पेक्षा जास्त फिनटेक कंपन्यांचे संस्थापक भेटले. त्यांना फिनटेक क्षेत्रात कशाची गरज होती हे यावेळीच त्यांनी ओळखले होते. २०१५ मध्ये अल्बिन्दर धिंडसा यांच्यासोबत झोमॅटोमध्ये चीफ फायनान्शिअल ऑफिसर म्हणून कामाला सुरुवात केली.
यामध्ये अश्निर यांनी कामाला सुरुवात केल्यानंतर दररोज देशभरातून ॲप्लिकेशनवर ३०,००० ऑर्डर मिळायला लागल्या. त्यानंतर पी सी ज्वेलर्स दिल्लीमध्ये अश्निर यांनी कामाला सुरुवात केली. येथे दुकानदार ग्राहकांशी कसा संवाद साधतात हे अश्निर यांना शिकायला मिळाले. २०१८ मध्ये अश्निर यांना शाश्वत नकरानी यांच्यासोबत भारतपेची स्थापना केली. क्युआर कोडच्या माध्यमातून भारत पेने फिनटेक क्षेत्रात पाय रोवले. अश्निर म्हणतात की, “नवीन काही करताना ते यशस्वी होईल का नाही हे माहित नसते, १००० वेळा अपयश स्वीकारल्यानंतर एकदा यश मिळते.”
भारत पे आणि अश्निर ग्रोव्हर.
भारत पेची स्थापना केल्यानंतर अश्निर आणि शाश्वत यांनी फिनटेक बाजाराचा अभ्यास केला होता. २०१८ मध्ये पेमेंट स्वीकारताना प्रत्येक ॲपला वेगवेगळे क्युआर कोड लागत. दुकानदाराला प्रत्येक व्यवहारामागे १.५ टक्के कमिशन संबंधित फिनटेक कंपनीला द्यावे लागत होते. तसेच युपीआय बाबत लोकांना जास्त माहिती नव्हती. त्यानंतर भारत पे बाजारात आल्यानंतर क्यूआर कोड दुकानदारांना मोफत मिळाला. ज्या दिवशी दुकानदाराला ग्राहकाकडून भारतपेवर व्यवहार झाले, त्यादिवशीच पैसे दुकानदाराला त्याच्या खात्यावर दिले जात होते. त्यामुळे भारत पेबाबत दुकानदारांमध्ये विश्वास निर्माण होत गेला.
कंपनीने त्यानंतर महसूल वाढावा म्हणून आर्टिफिशीअल इंटेलिजन्स पद्धतीचा वापर करायला सुरुवात केली. यावेळी कंपनी दुकानदाराला कमी कर्ज हवे असेल तर लगेच मंजूर करून द्यायची आणि जास्त कर्ज हवे असेल तर जास्त व्याज संबंधित दुकानदाराकडून घेतले जायचे. भारत पे दुकानदारांना १०,००० पासून ७,००,००० रुपयांपर्यंतचे कर्ज द्यायची. १२ महिन्यांसाठी कंपनी २ टक्के व्याजदर आकारायची. कंपनीला जवळपास ९६ टक्के कर्ज वसुली होऊन ४९ टक्के लोक परत कर्ज घ्यायला ॲपवर येत असायचे.
काही कारणांनी अश्निर ग्रोव्हर यांनी भारत पे कंपनी सोडली. सध्या त्यांच्या इंस्टाग्राम वॉलवर ते तिसरे युनिकॉर्न बनवण्याच्या कामात व्यस्त असल्याचे लिहिलेले आहे. ‘दोगलापण’ नावाचे त्यांचे पुस्तकही प्रकाशित करण्यात आले आहे. आता लवकरच अश्निर ग्रोव्हर काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.