आंध्र प्रदेशातील शिक्षिका नाचणी आणि तांदळाचे पीठ वापरून घेते कपाचे उत्पादन; वर्षाला कमावते तब्बल १० लाख रुपये.
टी जयलक्ष्मी या विशाखापट्टणम येथे शिक्षिका म्हणून काम करत होत्या. त्यांनी आता ही नोकरी सोडून नाचणी आणि तांदळाचे पीठ वापरून चहाचे कप बनवायला सुरुवात केली.
जयलक्ष्मी यांनी बोलताना सांगितले की, “एके काळी आम्ही दोघेही नोकरीला नव्हतो आणि पैसे कमावणे गरजेचे होते. त्या वेळेस खरे तर परिस्थितीनेच मला व्यवसाय चालू करण्याची कल्पना दिली.”
व्यवसायाचा कोणताही अनुभव नसताना जयलक्ष्मीने व्यवसायाचे वेगवेगळे मार्ग पाहायला सुरुवात केली. त्यांनी अशा उद्योगांच्या अभ्यासाला सुरुवात केली जे लोकांच्या दैनंदिन आयुष्यात थोड्याफार प्रमाणात बदल आणतील.
लोक रोज चहा आणि कॉफी पितात, या क्षेत्रात उद्योग चालू करावा असे सुरुवातीला त्यांना वाटायला लागले. प्लास्टिक कप आणि मातीच्या कपांपेक्षा चहाचे वेगळे कप कसे बनवता येतील याकडे लक्ष द्यायला त्यांनी सुरुवात केली. त्यांनी हे कप कसे बनवता येतील युट्युबची मदत घेतली.
यावेळीच खाद्य कप बनवावेत हा विचार त्यांच्या डोक्यात चमकून गेला. या क्षेत्रात असणाऱ्या कंपनीकडून फ्रेन्चायजी घ्यावी असे त्यांना वाटायला लागले. पण यापेक्षा स्वतःचे उत्पादन तयार करू हा विचार त्यांच्या मनात आला. त्या उत्पादनाची बाजारात गुणवत्ता आणि विशिष्ट पद्धतीसाठी ओळख पटेल अशाच उत्पादनाची निर्मिती करावी हे त्यांना मनोमन पटले.
त्यांनी एका ब्रॅंडकडून अशा पद्धतीचे कप खरेदी केले तेव्हा त्यांना त्यामध्ये त्रुटी आढळून आल्या. ते कपही मैद्याचे बनलेले होते. त्यांना निरोगी कप बनवायचे होते. त्र्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या पदार्थांच्या मिश्रणातून स्वतःच्या पद्धतीने कप बनवायला सुरुवात केली.
व्यवसायाला सुरुवात करण्यासाठी सुरुवातीला पैशांची गरज होती. अशावेळी जयलक्ष्मी यांनी प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्रायझेस (PMFME) योजनेतून कर्ज घेतले आणि बँकेत त्यांचे सोन्याचे दागिने देखील ठेवले.
सुरुवातीला वेगवेगळे प्रयोग करताना त्यांना १ लाख रुपयांच्या नुकसानाला सामोरे जावे लागले. पण अंतिमतः २ महिन्यानंतर नाचणी आणि तांदळाचे पीठ वापरून कपाचे योग्य मिश्रण शोधून काढले. त्यानंतर हैद्राबाद आणि बंगळूर येथून मशिनरी विकत घेतल्या. त्यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये एक उत्पादन युनिटची सुरुवात केली.
जयलक्ष्मी यांच्या चहाच्या कपात २० मिनिटापर्यंत गरम पेय ठेवता येते. त्या कपाचे ६० मिली आणि ८० मिली असे दोन भाग असून त्याची किंमत अनुक्रमे २.५ आणि ३.५ रुपये आहे. हे चहाचे कप चॉकलेट, स्ट्रॉबेरी, व्हॅनिला, इलायची (वेलची) इत्यादी वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये उपलब्ध आहेत.
हे फ्लेवर्स शीतपेयात मिसळून ते पिता येते. युट्युब आणि फेसबुकच्या माध्यमातून त्या कपांची जाहिरात करतात. महिन्याला ३०,००० ते ४०,००० कपांचे उत्पादन त्यांच्याकडून घेतले जाते. त्या वर्षाला ७ ते १० लाख रुपये या व्यवसायातून कमवतात.
त्यांना फक्त आंध्र प्रदेशच नाही तर ओडिशा, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि छत्तीसगड या राज्यांसह देशातील विविध भागातून ऑर्डर मिळत आहेत. महिला उद्योजकांसाठी राजलक्ष्मी या आदर्श उद्योजिका आहेत. त्यांनी तयार केलेल्या वाटेवर अनेक नवीन उद्योजिका भविष्यात नक्की तयार होतील हा विश्वास ठेवायला हरकत नाही.