शून्यातून आयपीओकडे ! – भारतीय स्टार्टअपची वाटचाल
झोमॅटो, स्विगी, गुगल-पे, पेटीएम, ओला, उबर अशी अनेक नावे आता सर्वांच्या जिभेवर रुळली आहेत. या सेवा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग कधी बनल्या हे ध्यानातही आले नाही. आता या सेवांचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. या नव्याने विस्तारत असलेल्या महत्त्वाच्या उद्योग क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण घडामोडींचा हा धांडोळा...
‘अन्न, वस्त्र, निवारा, स्मार्टफोन आणि इंटरनेट’ या नव्या पिढीच्या मुलभूत गरजा बनल्या आहेत. स्मार्टफोन शिवाय नव्या पिढीचं पानही हालत नाही, अशी परिस्थिती आहे. ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’मुळे अनेक नव्या गोष्टी उत्क्रांत होत आहेत. उद्योग – व्यवसायाचे स्वरुपही मोठ्या प्रमाणात बदलले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ज्या क्षेत्रांमध्ये मोठे बदल झाल्याचे दिसते, त्यात अप बेस्ड सेवांचाही समावेश आहे.
झोमॅटो, स्विगी, गुगल-पे, पेटीएम, ओला, उबर अशी अनेक नावे आता सर्वांच्या जिभेवर रुळली आहेत. या सेवा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग कधी बनल्या हे ध्यानातही आले नाही. आता या सेवांचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. या नव्याने विस्तारत असलेल्या महत्त्वाच्या उद्योग क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण घडामोडींचा हा धांडोळा…
देशातील घराघरात नाव पोहचलेल्या झोमॅटोचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) यशस्वी ठरल्यानंतर अनेक स्टार्टअप्सनी पब्लिक लिस्टींगसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पॉलिसीबाजार, ओयो, इक्झिगो, पेटीएम, मोबिक्विक, नायका, फार्मइझी या सारख्या अनेक स्टार्टअप्सने लिस्टींगसाठी सेबीकडे वर्णी लावली आहे.
देशातील अनेक स्टार्टअप्सने तंत्रज्ञान आणि ग्राहकाभिमूख पावित्र्याच्या सहाय्याने प्रस्थापितांचे धाबे दणाणून सोडले आहे. त्यामुळे स्टार्टअप्सने रिटेल आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. पण दुसरीकडे पारंपारिकदृष्ट्या स्टार्टअप्स ही जोखमीची गुंतवणूक मानली जाते. त्यामुळे या नवोदित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी की नाही, असा संभ्रम निर्माण होताना दिसत आहे.
झोमॅटो हा बीएसई आणि एनएससीवर शेअर लिस्ट करणारा पहिला स्टार्टअप आहे.
झोमॅटोच्या आयपीओला सर्व घटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि गुंतवणूकदारांनी झोमॅटोचे शेअर विकत घेण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे २३ जुलैला झोमॅटोच्या शेअर्सचे अनावरण झाले आणि पब्लिक ट्रेडींग सुरू झाले, त्या दिवशी झोमॅटोचे शेअर्स ११६ रुपयांवर उघडले. आयपीओ प्रक्रियेत कंपनीने तिचे शअर्स ७६ रुपयांना देऊ केले होते. सध्या झोमॅटोचे मार्केट कॅपिटलायझेशन एक लाख कोटींहून अधिक आहे.
झोमॅटो प्रामुख्याने रेस्टॉरंटमधून ग्राहकापर्यंत ऑर्डर पोहचवण्याची सेवा पुरवते. या क्षेत्रात झोमॅटोला सध्या तरी स्पर्धक नसल्याने काही ब्रोकरेज कंपन्यांनी दीर्घ काळात झोमॅटोच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची शिफरस केली होती. राकेश झुनझुनवाला या विख्यात गुंतवणूकदाराने झोमॅटोकडे कानाडोळा केला असला तरी या कंपनीच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला.
झोमॅटोनंतर आयपीओच्या रिंगणात उतरलेल्या प्रमुख स्टार्टअप्सची आता तोंडओळख करून घेऊ…
पेटीएम
विजय शेखर शर्माने सुरू केलेल्या डिजिटल पेमेंट कंपनीने जुलै महिन्यात १६ हजार ६०० कोटी रुपयांच्या आयपीओसाठी कागदपत्रे दाखल केली आहेत. या आयपीओमध्ये काही ताजे शेअर देण्यात येणार आहेत, तर काही विद्यमान गुंतवणूकदार ऑफर फॉर सेलच्या (ओएफएस) माध्यमातून स्वत:च्या मालकीचा काही
भाग कमी करणार आहेत. ओएफएसच्या प्रक्रियेत विजय शेखर शर्मा, एलीव्हेशन ग्रूप, जपानमधील सॉफ्टबॅंक आणि जॅक मा या चिनी उद्योगदाराने सुरू केलेली कंपनी अलिबाबा यांचा समावेश आहे.
पॉलिसीबाजार
ऑनलाइन वित्तीय सेवा पुरवठादार पॉलिसीबाजार आणि पैसाबाजारच्या पालक संस्थेने ऑगस्टमध्ये सेबीकडे आयपीओची कागदपत्रे दाखल केली. या आयपीओमधून पॉलिसीबाजार सहा हजार कोटी रुपयांची शेअर विक्री करणार आहे. या प्रक्रियेतून सॉफ्टबॅंक आणि कंपनीचे संस्थापक यशीश दहिया आणि आलोक बन्सल ओएफएसच्या प्रक्रियेतून काही शेअर्सची विक्री करणार आहेत.
जूनमध्ये विमा आणि नियामक आणि विकास प्राधिकरणाकडून थेट विमा ब्रोकिंगचा परवाना पॉलिसीबाजारला मिळाला आहे. यापूर्वी, पॉलिसीबाजार विमा उत्पादनांसाठी वेब अॅग्रीगेटर म्हणून कार्यरत होते. ब्रोकिंग परवाना मिळाल्याने कंपनीला ऑनलाइन उपस्थितीच्या पलीकडे जाऊन ऑफलाइन विमा क्षेत्रात काम करणे शक्य होणार आहे. २०२२ पर्यंत कंपनी २०० हून अधिक ऑफलाईन विमा विक्री केंद्रे सुरू करणार आहे.
ओयो
हॉटेल क्षेत्रातील प्रमुख स्टार्टअप ओयो आयपीओद्वारे आठ हजार ४३० कोटी रुपये उभारण्यासाठी आयपीओसाठी कागदपत्रे दाखल केली आहेत. कोरोना काळात जगभरातील पर्यटन क्षेत्राला बसलेल्या फटक्याची झळ ओयोला देखील बसली होती. आधीच नुकसानीत चाललेल्या ओयोच्या नुकसानीत भर पडली. त्यात देशातील आणि चीनमधील हॉटेल मालकांबरोबर कंपनीचे वाद सुरू होते. अशातच ओयोचा प्रमुख गुंतवणूकदार सॉफ्टबॅंकेला आर्थिक ताण झाल्याने ओयोला नविन निधी उपलब्ध करणे अवघड झाले आहे.
इक्झिगो
ऑनलाईन तिकीट बुकींग करणारे स्टार्टअप इक्झिगो आयपीओद्वारे एक हजार ६०० कोटी रुपये उभारणार आहे. मोबाईल निर्माता मायक्रोमॅक्स आणि एलिव्हेशन कॅपिटल हे विद्यमान गुंतवणूकदार ओएफएसच्याद्वारे काही प्रमाणात शेअर विकणार आहेत. इन्फो एज व्हेंचर्स, व्हाईट ओक, बे कॅपिटल, ओरिओस व्हेंचर पार्टनर्स, ट्रायफेक्टा कॅपिटल आणि मलबार इन्व्हेस्टमेंटसह जीआयसीने नुकतेच इक्झिगोमध्ये गुंतवणूक केली होती. सुमारे २५० दशलक्षाहून अधिक सबस्क्रायबर्स इक्झिगोचा वापर करतात.
सामान्यपणे, स्टार्टअप किंवा कुठलीही नविन कंपनी ही जोखमीची गुंतवणूक मानली जाते. एका यशस्वी स्टार्टअप मागे १० स्टार्टअप्सला गाशा गुंडाळावा लागतो. नव्याने व्यवसाय सुरू केलेल्या कंपन्यांकडे आर्थिक शाश्वती सिद्ध करण्यासाठी पुरेसा डेटा नसल्याने गुंतवणूकदार सावध पावित्रा घेऊन असतात. मुरलेले गुंतवणूकदारांना स्टार्टअपच्या ढिगाऱ्यातून हिरा शोधून काढण्याची कला अवगत आसते.
स्टार्टअपने काही पावसाळे पाहिले आणि एक आर्थिक प्रगल्भता गाठल्या नंतर आयपीओसाठी पात्र ठरू शकतात.
एकदा का आयपीओ लिस्टींग झाले की त्या कंपनीवर कंप्लायंसचा भार मोठ्या प्रमाणात वाढतो. छोट्या स्वरूपातील स्टार्टअप्सला धोरणात्मक निर्णय घेताना जी लवचिकता असते ती लिस्टेड कंपनीला नसते. त्यामुळे एक टप्पा ओलांडल्या शिवाय स्टार्टअपला आयपीओचा मार्ग पत्करणे शक्य होत नाही. झोमॅटो, पॉलिसीबाजार, ओयो, इक्झिगो, पेटाएम, मोबिक्विक या स्टार्टअप्सची स्थापना होऊन १५ वर्षांचा काळ गेला आहे. त्यामुळे या कंपन्या लिस्टींग होण्याइतक्या प्रगल्भ झाल्या आहेत, असे गुंतवणूकदारांचा एकात्मिक होरा आहे.
दुसरे म्हणजे यशस्वी लिस्टींगसाठी योग्य वेळ साधणे महत्त्वाचे असते. गेल्या काही महिन्यांपासून शेअर मार्केट नवनवीन उच्चांक गाठत आहे. स्टॉक मार्केटच्या ‘बुल रन’मध्ये सहसा कंपन्या लिस्टींगची प्रक्रिया पार पाडतात. कारण या कालावधीत आयपीओला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता चांगली राहते.
आयपीओ प्रक्रियेस बराच वेळ लागू शकतो म्हणून, काही कंपन्या अमेरिकेतील नॅस्डॅकमध्ये लिस्टींग करण्यासाठी ‘एसपीएसी’चा मार्ग अवलंबत करीत आहेत. ‘एसपीएसी’ म्हणजे स्पेशल पर्पज अॅक्विझिशन कंपनी. ‘एसपीएसी’चा मुळात स्वत:चा काही व्यवसाय नसतो. ती एक शेल कंपनी असते. ‘एसपीएसी’चा वापर करून एखादे स्टार्टअप लिस्टींग करू शकते. एका ‘एसपीएसी’ अनेक स्टार्टअपचे शअर्सचे संपादन करू शकते. गुंतवणूकदार स्टार्टअपचे शेअर ‘एसपीएसी’च्या माध्यमातून विकत घेऊ शकतात. ज्या वेळेस ‘एसपीएसी’ एखाद्या स्टार्टअपचे शेअर विकत घेतो, त्या नंतर गुंतवणूकदार एकतर स्टार्टअपचे शेअर विकत घेऊ शकतात नाहीतर खुल्या बाजारात विकू शकतात.
धोक्याची घंटा!
झोमॅटोच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाल्याने सगळ्या स्टार्टअपला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळेल असे नाही. कुठल्याही आयपीओला सेबी या शेअर मार्केट नियंत्रकाकडून हिरवा कंदील मिळाल्या शिवाय पुढचे पाऊल टाकता येत नाही. झोमॅटो नंतर ज्या स्टार्टअप्सने आयपीओच्या प्रक्रियेला सुरवात केली आहे, त्यापैकी काही स्टार्टअप्सला कायदेशीर सव्यापसव्यातून पार पडावे लागणार आहे.
उदाहरणार्थ, तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला असताना देखील पेटीएमच्या आयपीओला सेबीने अजून मान्यता दिलेली नाही. पेटीएमने आयपीओची कागदपत्रे सेबीकडे जुलैमध्ये जमा केली होती. साधारणपणे, सेबीला एखाद्या आयपीओला मान्यता देण्यासाठी दोन महिने लागतात.
पेटीएमच्या बाबतीत कंपनीच्या एका माजी संचालकाने पेटीएमच्या विरोधात सेबीकडे तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीत कंपनीच्या आयपीओला मान्यता देण्यात येऊ नये अशी विनंती त्या माजी संचालकाकडून करण्यात आली आहे. कंपनीला त्रास देण्याच्या उद्देशाने ही तक्रार करण्यात आली आहे, असे पेटीएमचे म्हणणे आहे.
तसेच ओयो या हॉटेल बुकींग सेवा पुरवणाऱ्या स्टार्टअपच्या विरोधात झॉस्टेल सेबीकडे विनंती केली आहे. या दोन कंपन्यांमधील कायदेशीर वाद लक्षात घेता, सेबीने ओयोचा आयपीओ रद्द करावा, अशी विनंती झॉस्टेलने केली आहे.
त्यामुळे सगळ्याच स्टार्टअपचे आयपीओ सुरळीत पार पडतील याची शाश्वती नाही.
- शशांक दिडमिशे
लेखक स्टार्टअप या विषयाचे अभ्यासक आहे.