पारनेर तालुक्यातील सुपुत्र रविराज खारमाळेंची गोष्ट; परदेशातील १६ देशांमध्ये करतात आयात निर्यातीचा व्यवसाय

सगळीकडे सध्या उद्योजकतेचे वारे मोठ्या प्रमाणावर वाहत आहे. त्यात शार्क टॅंक इंडिया कार्यक्रमामुळे अजून भर पडली आहे. तसे शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही व्यवसाय केले जातात. पण या व्यवसायांना मोठ्या पातळीवर घेऊन जाणे अवघड असते.

0

पारनेर तालुक्यातील काळकूप हे छोटेसे गाव आहे. या गावातील रविराज भागाजी खरमाळे यांची अशीच गोष्ट आहे. हे नाव चर्चेत येण्यामागचे कारण म्हणजे ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात महाराष्ट्रातून बोटावर मोजता येतील एवढीच लोक उपस्थित होती. आता सर्वात आधी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे काय ते समजून घेऊयात. 

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे ‘जागतिक आर्थिक परिषद’ असा त्याचा अर्थ होतो. या परिषदेत उद्योजकीय, राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील जगातील नामवंत लोक हजेरी लावतात.

२०२३ वर्षी होणारा हा  कार्यक्रम १६ ते २० जानेवारी २०२३ दरम्यान दावोस, स्वित्झर्लंड येथे पार पडला. या कार्यक्रमात रविराज खरमाळे सर आरबीके इंटरनॅशनल कंपनीचे प्रतिनिधी म्हणून हजर राहिले होते. या ठिकाणी मुकेश अंबानी, गौतम अदानी, टाटा ग्रुपचे एन चंद्रशेखरन, आदर पूनावाला, कुमार मंगलम बिर्ला, सज्जन जिंदाल, नदीर गोदरेज यांचीही उपस्थिती होती.

रविराज खरमाळे सरांची आरबीके इंटरनॅशनल नावाची कंपनी असून १७ देशांमध्ये आयात निर्यातचा कंपनी व्यवसाय करते. अहमदनगर जिल्ह्यात अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात कंपनीने गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्यात १२ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून या प्रकल्पामुळे २०० स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली. यावेळी खरमाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली. दोघांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती खरमाळे यांनी दिली.

रविराज खरमाळे यांना भेटून याबाबतची अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. रविराज खरमाळे यांनी पुढील माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “आरबीके इंटरनॅशनल भारतात गुंतवणूक करण्यास इच्छुक होते. त्या गुंतवणुकीचा आराखडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखवण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.” रविराज खरमाळे यांची पारनेर तालुक्यातील जामगाव गावाजवळ ‘जेडीआरएस अग्रो प्रायव्हेट  लिमिटेड’ नावाने कंपनी आहे. त्या कंपनीचा कारभार मच्छिन्द्र खरमाळे सांभाळतात. 

येथे मशरूम बनवण्याचा प्लांट आहे. येथे आमच्या टीमने भेट दिली. तेव्हा आमच्यासोबत प्रगतिशील शेतकरी बी. एन. फंड  उपस्थित होते. त्यावेळी खरमाळे सरांनी प्लांट बद्दलची माहिती समजावून सांगितली. प्लांटवर मशरूम बनवण्यासोबतच त्यासाठी लागणारा कच्चा माल येथेच बनवला जातो. सर्व फिरून पाहिल्यानंतर मशरूम कसे बनवले जाते याबाबतची प्राथमिक माहिती समजली.

मशरूम बनवण्यासाठी एकूण ५५ दिवसांचा कालावधी असतो. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे वीज २४ तास या प्लान्टवर उपलब्ध असायला हवी. कारण मशरूमची पूर्ण प्रक्रिया कोल्ड स्टोरेजवरच अवलंबून असते. त्यामुळे येथील वीज भाळवणी येथील एमआयडीसी मधून घेण्यात आली आहे. येथे सर्व तापमान नियंत्रित करून मशरूमची वाढ केली जाते. जेडीआरएस कंपनीत मशरूम बनवण्यापासून पॅकेजिंग पर्यंत सर्व कामे केली जातात. 

कंपनीत स्वच्छतेकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाते. येथे मशरूमच्या स्वच्छतेपासून कामगारांच्या वैयक्तिक आरोग्याची काळजी घेतली जाते. कंपनी दररोज ३ टन मशरूमचे उत्पादन काढते. मशरूम बनवल्यानंतर उरलेला कच्चा माल फेकून देण्यापेक्षा येथे प्रक्रिया केला जातो आणि त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यात येते. अशाप्रकारे कृषी उत्पादन क्षेत्रातील पारनेर तालुक्यातील सर्वात मोठा पहिला प्रकल्प आहे. 

आगामी काळात मशरूमचा प्रकल्प वाढवण्यासोबतच, गहू प्रक्रिया उद्योग, सीताफळ प्रक्रिया उद्योग परिसरात चालू करण्याचा आरबीके इंटरनॅशनल कंपनीचा मानस आहे. यामुळे ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. ग्रामीण उद्योजकतेची खऱ्या अर्थाने आरबीके इंटरनॅशनल कंपनीने सुरुवात केली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.